लोणी काळभोर (पुणे) : पुणे शहरातून सातारा, नाशिक, मुंबई, नगरला जाणाऱ्या सर्वच मोठ्या रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी, हजार कोटी, दहा हजार कोटी असे सर्वसामान्य जनतेला लिहता न येणारा आकडा दरवर्षी मंजूर होत आहेत. पुणे ते शिरुर महामार्गावर मेट्रो सुविधेसह दुमजली एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून ७५४७.६० कोटी रुपयांच्या निविदा सूचना अखेर प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असताना मात्र पुणे शहरातून सोलापुरला जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी केंद्र अथवा राज्य शासनाकडून मागील १० वर्षांच्या काळात एक दमडीही मंजूर झाली नसल्याची बाब पुढे आली आहे.
पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते शिरुर महामार्गावर मेट्रो सुविधेसह दुमजली एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी निविदा प्रक्रिया नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. दुसरीकडे, या मार्गावरील वाहतूक कोंडी कायमस्वरुपी सोडविण्यासाठी हजारो कोटी खर्चून दुमजली उड्डाणपूल उभारण्याच्या हालचाली चालू आहेत. तर नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, काही कामेही सुरु झाली आहेत. मात्र, तेवढीच वाहतूक कोंडी असणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गासाठी मात्र एकही नेता, आमदार-खासदार बोलत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. खासदार, आमदार यांच्यासह अनेक नेते केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांना भेटल्याचे फोटो दाखवूनच, जनतेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे.
पुणे शहरातून सातारा, नाशिक, मुबंई, नगरला जाणाऱ्या सर्वच मोठ्या रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होत असल्याची बाब अतिशय चांगली आहे. मात्र, या सर्व रस्त्यासाठी निधी मिळतो पण नगर रस्त्यासारखीच वाहतूक कोंडी पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, आकाशवाणी, भैरोबानाला, पुलगेट चौक, किर्लोस्कर पूल अशा दहाहून अधिक ठिकाणी रोज होत असताना या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणीही एक शब्द काढत नसल्याचे चित्र आहे. नगर रस्त्यावरुन प्रवास करणारे देशाचे, राज्याचे अथवा पुणे शहराचे नागरिक असतील तर, पुणे-सोलापूर महामार्गावरुन प्रवास करणारे कोण असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.
संसदपटू खासदार-कार्यसम्राट आमदार नावालाच
खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार या दोघेही मागील चार वर्षांच्या काळात नगर रस्ता, नाशिक या रस्त्याची दुरुस्ती व या रस्त्यांच्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याबद्दल बोलत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, दोघांनीही मागील चार वर्षांच्या काळात पुणे-सोलापुर महामार्गावरील हडपसर ते कासुर्डी या दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केल्याचेही कोणालाही दिसून आलेले नाही. कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यानचा टोल बंद झाल्यापासून, या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. वाहतूक कोंडी ही बाब सततची बनलेली आहे. अपघात वाढले आहेत. रस्त्यावर अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ‘संसदपटू खासदार’-कार्यसम्राट आमदारांबरोबरच आत्ताचे सत्ताधारीही मूग गिळून बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
एनएचएआयच्या प्रकल्प संचालकांशी संपर्क नाही
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गाच्या विकासासाठी अथवा दुरुस्तीसाठीचा प्रस्तावाची व डीपीआरची माहिती मिळू शकलेली नाही.
पुणे-सोलापूर महामार्गाचा प्रश्न आमदार कुल लावतील मार्गी
ज्याप्रमाणे कै. बाबूराव पाचर्णे यांनी पुणे-नगर मार्गाचा प्रश्न मार्गी लावला. त्याप्रमाणे पुणे-सोलापूर मार्गाचा प्रश्न दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल मार्गी लावतील. पुणे-सोलापूर महामार्गाच्या विकासासाठी आमदार कुल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सध्या या मार्गाचे डीपीआर बनविण्याचे काम सुरु आहे. त्यानुषंगाने तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गाचा प्रश्न आमदार कुल हे 100 टक्के सोडवतील.
– प्रदीप कंद, भाजप नेते आणि संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
लोणी काळभोर येथील मालधक्क्यातून पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात स्टील व सिमेंटचा पुरवठा केला जातो. तसेच या मार्गावरून वाळूचे ट्रक व मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. पूर्व हवेलीतील गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढलेले आहेत. त्यामुळे नगर रस्त्यापेक्षा पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसेच छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. त्यामुळे प्रशासनाने पुणे-सोलापूर महामार्गाच्या विकासासाठी त्वरित प्रयत्न करावे.
– मनीष काळभोर, उद्योजक, लोणी काळभोर, ता. हवेली.