लोणी काळभोर : परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेल्या अवमानाच्या व सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता.17) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध संघटनांच्या वतीने जोरदार घोषणेबाजी करीत लोणी स्टेशन चौकात परभणीतील दुर्घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
आंदोलकांनी यावेळी पुणे सोलापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विविध संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आले. त्यावेळी हे निवेदन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी स्वीकारले. यावेळी आरपीआयचे (आठवले) पश्चिम महाराष्ट्र युवकचे सचिव दीपक आढाळे, बहुजन दलित महासंघ अध्यक्ष आनंद वैराट, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन जगताप, वंचितचे हवेली तालुकाध्यक्ष केतन निकाळजे, रमेश गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष मारुती कांबळे, ॲड. बाळासाहेब दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, नितीन लोखंडे, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे राकेश लोंढे, केतन निकाळजे, करण खंडागळे, विशाल शेलार, संजय भालेराव,अमोल टेकाळे, तानाजी तापकिरे, अभिजीत पाचकुडवे, संजय गायकवाड व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्थ असून संविधानाचा अवमान हा आम्ही खपवून घेणार नाही, संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी. या घटनेमुळे संपूर्ण आंबेडकरवादी व संविधानप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. याप्रकरणी मा. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून संविधानाचा अवमान करणाऱ्या नराधमाला गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे. तसेच भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलककराचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयास शासनाने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करून कुटुंबियातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत घ्यावे. अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, लोणी स्टेशन चौकात हे आंदोलन एकदम शांततेच्या मार्गाने पार पडले. मात्र, आंदोलन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून यावेळी लोणी काळभोर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, गोपनीय विभागाचे प्रमुख पोलीस हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, डीओ संदीप जोगदंड, प्रदीप क्षीरसागर, तेज भोसले, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, संदीप धुमाळ, महिला पोलीस व पोलीस अंमलदारांचा मोठा फौज फाटा उपस्थित होता.
View this post on Instagram