पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इयत्ता नववीतील एका विद्यार्थ्यांचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची धक्कादायक घटना मांजरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांकडून एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये अल्पवयीन मुलगा (वय १५) गंभीर जखमी झाला आहे. फिर्यादी मुलगा मांजरी परिसरातील एका शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेतील वार्षिक समारंभावरून त्याचा अन्य एका विद्यार्थ्यांशी शाब्दिक वाद झाला होता. फिर्यादी मुलगा मंगळवारी (ता. १९) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वर्गात बसला होता. त्यावेळी त्याच वर्गातील दुसरा १४ वर्षीय मुलगा अचानक पाठीमागून आला. त्याने त्या मुलाच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केला. गळ्याच्या उजव्या बाजूस काचेचा तुकडा घुसवल्याने त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी हल्ला करणाऱ्या मुलाने जखमीला ‘मी तुझी विकेट पाडीन’ अशी धमकी दिली. या घटनेमुळे वर्गातील इतर मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी जखमी मुलाने दुसऱ्या दिवशी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हल्ला करणाऱ्या मुलाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दादासाहेब रोकडे करीत आहेत.