पुणे : पुण्यातील रामटेकडी परिसरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूसाठी पैसे देण्यावरुन झालेल्या हाणामारीत अल्पवयीन मुलांनी गुंडाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रामटेकडी परिसरातील वंदेमातरम चौकात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात राज शिवशरण याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी निखिल कैलास चव्हाण (वय १६, रा. वंदेमातरम चौक, रामटेकडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशरण आणि महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी, दुर्गेश बल्ल्या गायकवाड हे एकमेकांच्या ओळखीतले आहेत.
दारू पिऊन ते शुक्रवारी मध्यरात्री दीड वंदेमातरम चौकात थांबले होते. त्यावेळी दारु पिण्यास मुलांनी राजूकडे पैसे मागितले असता त्याने नकार दिला आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. शिवशरण याने शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलांनी त्याला वीट, दगड, सिमेंटचे तुकडे आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील एकाने शिवशरण याच्या डोक्यात दगड घातला तर, दुसर्याने डोक्यात दारुची बाटली फोडली.
आपल्या मामाला वाचविण्यास गेलेल्या फिर्यादीच्या डोक्यात महेश शिंदे याने बाटली मारुन जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिवशरण याला पोलिसांनी ससून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले. वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितले.