पुणे : पुणे शहराला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. पुण्यामध्ये मद्यधुंद पतीकडून पत्नीला लॉजवर नेऊन चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडली असून, या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काजल आणि कृष्णा यांच्यामध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. या दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता. त्यामुळे कृष्णाने काजल हिला चर्चेसाठी बोलवले होते. शनिवारी दुपारी ते अश्विनी लॉजमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी मद्यपान केले. मद्याच्या नशेमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद इतका टोकाचा कि त्यात कृष्णाने काजलवर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर खोलीला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला.
मित्रांसमोर उघड केला प्रकार
कृष्णाने मित्रांसोबत मद्य प्राशन केले. त्यावेळी त्याने मित्राला सांगितले की त्याने त्याच्या पत्नीचा खून केला आहे. मित्राला हे कळताच ते घाबरले. त्यांनी थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन, मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी कृष्णा कदम याला ताब्यात घेऊन असून त्याच्याकडे अधिक चौकशी केली आहे. त्यावेळी त्याने लॉजवर नेऊन काजलचा खून केल्याची कबुली दिली. मात्र, आरोपीने खून कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.