पुणे: शहरात फसवणुकीच्या अनेक घटना घडल्यानंतर पुणेकरांनी गुंतवणूक करतांना पहिले संपूर्ण चौकशी करून घ्यावी मग गुंतवणूक करावी असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुण्यात सातत्याने फसवणुकीचे प्रकार घडतांना दिसून येत आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आणि ऑनलाइन कामांचा उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे प्रकार घडत आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत शेअर बाजारातील गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या घोटाळेबाजांनी एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात या फसवणुकीबद्दल तक्रार दाखल केली आहे. पुण्यात घडलेल्या आणखी एका घटनेत ऑनलाइन काम देण्याच्या आमिषाने महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. सोशल मीडिया पोस्ट पाहण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन घोटाळेबाजांनी महिलेला गंडा घातला आहे.
जानेवारी महिन्यात ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. उच्च परताव्याचे आमिष दाखवून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे चोरट्यांनी सांगितले असता वृद्धाने वेळोवेळी 23 लाख रुपयांची गुंतवणूक केली, दरम्यान, सुरवातील चांगला नफा दिल्यानंतर पैसे पाठवण्यास टाळाटाळ करण्यात आली, दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाला आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
दुसऱ्या घटनेत महिलेला पोस्ट, व्हिडीओ व ग्राफिक्स व्हिडीओला व्ह्यू मिळवून दिल्यास उच्च परतावा मिळेल असे आमिष दाखविले. महिलेला प्रथम एक काम दिले, पैसेही पाठवले, त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. नंतर आणखी रक्कम गुंतविण्यास चोरट्यांनी सांगितले. गुतंवणूक केल्यानंतर महिलेला चोरट्यांनी पैसे पाठवणे बंद केले असता महिलेला फसवणूक झाल्याचे उघड झाले, दरम्यान, महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
जास्त परतावा देणाऱ्या अमिषाला आहारी न जाता, संपूर्ण पडताळणी करून मग गुंतवणूक करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा पुणे पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. पोलिस प्रकरणांची चौकशी करत आहेत आणि घोटाळेबाजांना शोधण्यासाठी अधिक तपास करत आहेत.