पुणेः महादेव बुक अॅपच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये बेकायदा जुगार व सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, यासंदर्भात पोलिसांनी ९३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ४५ लॅपटॉप, १९० मोबाईल फोन आणि ४५२ बँकेची पुस्तके असा सुमारे ६३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील तीन मुख्य आरोपी पसार झाले आहेत. कुणाल सुनील भट (२८, रा. व्हिजन गॅलेक्सी, नारायणगाव, मूळ जळगाव), समीर युनूस पठाण (२५, रा. जुन्नर), राशीद कमाल शरीफ फुल्ला (२८, वजिराबाद, दिल्ली, अमजदखान सरदारखान (३२, रा. दुर्गागंज, जी. लखनौ, उत्तर प्रदेश) आणि यश राजेंद्र सिंग (२७, रा. जय गणेशनगर, चौटाला, राजस्थान) या मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपासासाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महादेव अॅपचा मालक सौरभ चंद्रकार आणि मुख्य संचालक रवी उप्पल यांना ईडीने गेल्या वर्षी अटक केली. या अॅपच्या माध्यमातून सुमारे २५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. देशात आणि जगभरात या अॅपच्या माध्यमातून जुगार आणि सट्टेबाजी चालते. त्याबाबत मध्य प्रदेशात सर्वात आधी कारवाई झाली. त्यानंतर देशभरात निरनिराळ्या शहरांत आणि गावांत छापे टाकण्यात आले. त्यामध्ये अटक आरोपींकडून नित्य नवी माहिती पुढे येत असून, त्याआधारे आतापर्यंत शेकडो आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. दरम्यान, नारायणगावमधील गॅलेक्सी कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये अद्यापही या अॅपच्या माध्यमातून जुगार व सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली. त्यानंतर या विभागाच्या पथकाने बुधवारी छापा टाकला. तेथील ९६ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक शिळीमकर, जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, नारायणगावचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.