पुणे: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांना चाप लावण्यासाठी एक नाविन्यपूर्ण असे पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना पोलीस ठाण्यात चकरा न मारता घरबसल्या व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून ‘व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी ९९२२८९२१०० हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील अवैध धंदे मग ते जुगार, दारूविक्री असो की अन्य बेकायदा व्यवसायांबाबत तक्रार करायची इच्छा अनेक जागरूक नागरिकांना असते. परंतु, पोलीस ठाण्यात जाण्यासाठी वेळेची असलेली कमतरता अथवा भीती यामुळे ते तक्रार देण्यापासून मागे हटतात. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी सदर उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आता कोणत्याही नागरिकाला अवैध धंद्यांची माहिती, फोटो आणि व्हिडिओ थेट नमूद केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवून तक्रार नोंदवता येईल. या सुविधेमुळे तक्रार करणे सुलभ तसेच सुरक्षित होणार आहे.
सदर ‘व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली’ अंतर्गत नागरिकांनी ९९२२८९२१०० या क्रमांकावर अवैध धंद्यांबाबत माहिती पाठवायची आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची गोपनीयता राखत तात्काळ कारवाईसाठी ती संबंधित पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. या प्रणालीमुळे अवैध व्यवसायांवर त्वरित आळा घालणे शक्य होईल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे. याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी म्हटले की, “नागरिकांचा सहभाग हा गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे. संबंधित प्रणालीमुळे लोकांना पोलिसांशी थेट जोडले जाणे सोपे होणार असून समाजात सुरक्षितता वाढेल.”
या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना केले आहे. “आपल्या आजूबाजूला काहीही बेकायदा सुरू असेल, तर घाबरू नका. केवळ व्हॉट्सॲपवर माहिती पाठवा, बाकी जबाबदारी आमची,” असे पोलिसांनी म्हटले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर नजर ठेवणे आणि त्यांना आळा घालणे सोपे होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.