पुणे : कल्याणीनगर भागात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत तरुण- तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात कारच्या मालकाला तात्पुरता परवाना का रद्द करू नये, अशी नोटीस काढण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात कार एक वर्ष नोंदणी न करण्याची तरतूद आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
कल्याणीनगर परिसरात अपघात झालेल्या पोर्शे कारची पुण्यात नोंदणी केलेली नव्हती. या कारची पासिंग झालेली नसल्यामुळे तिला क्रमांकदेखील नव्हता. बंगळुरू येथील वाहन विक्रेत्याकडून पोर्शे कार घेताना तात्पुरता वाहन परवाना (सीआरटीएम) घेण्यात आला होता. या तात्पुरत्या वाहन परवान्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत असते. या काळात त्याने पुणे आरटीओकडे टॅक्स भरून व कागदपत्रे देऊन नोंदणी करणे आवश्यक होते. पण, त्यांनी कारची नोंदणी न करता ती रस्त्यावर आणली.
तसेच, त्या कारने अपघातदेखील केला. त्यामुळे पुणे आरटीओने आता पोर्शे कारमालकाला सध्या असलेला तात्पुरता परवाना का रद्द करू नये, अशी नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता एक वर्ष कार रस्त्यावर येणार नाही.