पुणे : विविध संघटना तसेच ऑटोरिक्षा वाहनचालक/मालक यांच्याकडून ऑटोरिक्षा मीटर तपासणी ट्रॅक सुरु करण्याबाबत अनेक निवेदने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कर्वेनगर येथील अलंकार पोलीस स्टेशन समोर आणि रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट येथील इगलबर्ग कंपनी लेन नं. ३ येथे ९ सप्टेंबरपासून ट्रॅक सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांनी तातडीने आपले मीटर तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे.
तसेच रामटेकडी येथे ऑटोरिक्षा चालकांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे. मात्र, तेथे दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागत असल्याने हा ट्रॅक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सर्व रिक्षा संघटना, वाहनचालक व मालक यांना ऑटोरिक्षा मीटर कॅलीब्रेशन करावयाचे असल्यास कर्वेनगर अलंकार पोलीस स्टेशन समोर तसेच आळंदी रोड कार्यालय येथे रिक्षा घेऊन आपल्या मीटरची तपासणी करुन घ्यावी.