पुणे: रिंग रोडबाबत राज्याचा महसूल विभाग आणि जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांकडे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्या सर्व प्रश्नांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी करण्यात आली असून, ते प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन रिंग रोडच्या भूमिपूजनाची तारीख येत्या काही दिवसांत ठरवू,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यातील रिंग रोडसाठी पश्चिमेकडे ९६ आणि पूर्वेकडे ८२ टक्के एवढे भूसंपादन झाले आहे. त्यामुळे एका बाजूने रस्त्याचे काम करणे शक्य होणार आहे. भूमिपूजन होत नसल्यामुळे रिंग रोडच्या कामाला विलंब होत असल्याची टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारले असता, ‘रिंग रोडसाठी आणखी जागेचे भूसंपादन करणे बाकी आहे. त्यामध्ये काही इमारतींमुले अडचण निर्माण झाली असून हा प्रश्न कसा मार्गी लावायचा, हे आम्ही ठरवत आहोत. यामधून मार्ग काढत रिंग रोडचे काम लवकरच सुरू करू,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
‘पुणे शहर आणि बाजूच्या परिसरात वाहतुकीची समस्या ही मोठी होत चालली असून, यावर मार्ग काढल्याशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे प्रश्न केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून सोडवण्यात येणार आहे. राज्याशी संबंधित असलेले प्रश्न आम्ही सोडवू. वाहतूक कोंडीच्या सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात येत असून काही ठिकाणी ते पूर्वीच केले आहेत. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी बोलाविले जातील. त्यांना विश्वासात घेऊनच या समस्येधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.