पुणे : पुणे शहर परिसरात आज पहाटेपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही भागांत पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची त्रेधातिरपट उडाली. कोथरूड, पाषाण, सुस, लोणी काळभोर परिसरात पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील किमान १० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, अचानक पडलेल्या भुरभुर पावसामुळे कामाला जात असलेल्या वाहनचालकांची त्रेधातिरपीट झाली. अनेक ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या. शहरातील किमान १० ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. वाहनांमधील ऑईल रस्त्यावर सांडल्यामुळे पावसाचे पाणी आणि ऑईल यांचे मिश्रण झाल्याने छोटी चाके असलेली दुचाकी वाहने घसरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बिबवेवाडी, फातिमानगर, कात्रज येथील राजीव गांधी उद्यानासमोर, वानवडी, राजभवन समोरील रोड, म्हात्रे पुलाजवळ तसेच सेनापती बापट रोडवरील सिंबायोसिसवरील उतारावर सकाळी अनेक वाहने घसरली. यामध्ये काही दुचाकीस्वार जखमी झाले. सुमारे १० ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीस्वारांनी वाहने सावकाश चालवावी, भुरभुर पावसामुळे झालेल्या दलदलीच्या रस्त्यावरुन जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.