पुणे : कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर कोरोना हद्दपार होईल, अशी अपेक्षा असतानाच नवीन व्हेरियंटने पुन्हा भितीचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण कोकणात सापडल्यानंतर आता ठाणे आणि पुणे शहरात देखील कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात नवीन व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील नव्या व्हेरियंटची संख्या दहा झाली आहे.
ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट ‘जेएन १’ प्रकारामुळे चीन, सिंगापूर, भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. नवीन व्हेरियंट ‘जेएन १’चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला चव आणि वास कळत नाही. कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ‘जेएन १’चे पुणे शहरात दोन तर जिल्ह्यामध्ये एक रुग्ण आढळला आहे. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या दहा झाली आहे. या सर्व रुग्णांना नवीन व्हेरियंटची सौम्य लक्षणे होती. त्यांना घरीच विलिगीकरणात ठेवण्यात आले. आता ते बरे देखील झाले आहेत. पुणे शहरातील रुग्ण अमेरिकेतून आला होता. ४१ वर्षीय पुरुषाला कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. राज्यात दहा पैकी आठ जणांनी लस घेतली आहे. या सर्वांचे वय ४० पेक्षा जास्त आहे.
ठाण्यात नवीन व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. या पाच रुग्णांमध्ये १ महिला व ४ पुरुष आहेत. या सर्वांना ताप आसल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर नवीन व्हेरीएन्टचे हे रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे. ठाण्यात सध्या कोरोनाची लक्षणे असलेले २८ रुग्ण आहेत.