पुणे : वाहनांच्या नंबरप्लेटवर पोलीस, पत्रकार, व्हीआयपीसह दादा, नाना, काका अशी नावे लिहिणाऱ्या २८३ जणांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. आणि त्यांच्याकडून १० दिवसात तब्बल सव्वा दोन लाखाचा दंड वसुल केला आहे.
पुणे वाहतूक पोलिसांनी ११ ते २१ ऑगस्ट दरम्यान नियमानुसार नंबर प्लेट नसणाऱ्या २८३ वाहनांवर कारवाई केली. तसेच भविष्यातदेखील ही कारवाई सुरू राहणार असून, ज्यांची नंबरप्लेट नियमानुसार नाही त्यांनी नियमानुसार करून घ्यावी; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. असे आवाहन देखील पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन गृह विभागाने खासगी दुचाकी चारचाकी वाहनांवर अशाप्रकारे लोगो अथवा नाव वापरल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय वाहनांच्या व्यतिरिक्त वाहनधारक कोणत्याही खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासन, भारत सरकार, भारताची राजमुद्रा, सैन्यातील विविध चिन्हांची प्रतिकृती, आणि पोलीस असे नाव लिहू शकत नाही. किंवा पोलिसांचे पोलिसांचे बोधचिन्ह अथवा पाट्या लावू शकत नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशात वाहनांच्या नंबरप्लेटवर काहीही लिहू नये. असे आदेश दिलेले आहेत. परंतु, या आदेशाचे काही नागरिक राजरोसपणे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अशी वाहने पोलीस तपासणीतून सहजासहजी सुटतात. मात्र, आता त्या वाहनचालकांवर महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम २०१३ कलम १३४(६) आणि मोटार वाहन कायदा कलम ७७ प्रमाणे करण्यात येणार आहे. असा कडक इशारा पुणे वाहतूक पोलिसांनी दिला आहे.