पुणे : पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पहिल्या पत्नीपासून तलाक घेतल्याचे खोटे सांगत दुसरा विवाह केला. त्यानंतर पत्नीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला. पत्नी आजारी पडल्यानंतर तिला भूत लागल्याचे सांगून एका मौलवीकडे नेऊन तिच्यासोबत अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार जणांवर जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत 26 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासु-सासरे आणि पहिल्या पत्नीवर भारतीय न्याय संहिता कलम 86, 115(2), 352, 351(2), 3(5) सह जादुटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना पतीचे पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्याचे खोटे सांगितले होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना फसवून दुसरा विवाह केला. दुसरा विवाह केल्यानंतर हुंड्यासाठी पत्नीला त्रास दिला. दरम्यान, आरोपी पतीची पहिली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी आली. त्यानंतर त्यांच्यात वारंवार वाद होत राहिले. सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून होत असलेल्या त्रासामुळे फिर्यादी या मानसिक त्रासामुळे आजारी पडल्या.
फिर्यादी या आजारी पडल्यानंतर आरोपींनी तुला भूत लागल्याचे सांगून एका मौलानाकडे घेऊन गेले. त्याठिकाणी गेल्यावर मौलाना याने एक लाल रंगाचे पातळ औषध फिर्यादी व्यक्तीस पिण्यासाठी दिले. त्यानंतर पतीने फिर्य़ादी व्यक्तीस येरवडा येथील त्यांच्या काकांच्या घरी सोडले. यावेळी सासरच्या लोकांनी फिर्य़ादी व त्यांच्या काकांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन घरातून हाकलुन दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.