पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. रेल्वे गाडीमध्ये अथवा स्थानकावर एखादा जखमी झाल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. तसेच हे वैद्यकीय कक्ष चोवीस तास प्रवासी व सामान्य नागरिकांसाठी सुरू राहणार आहे.
या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिकचे चेअरमन डॉ. पी. जी. ग्रांट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे रेल्वे विभागाच्या रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. के. संजीव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रुबी हॉल क्लिनिकचे बेहराम खोदाइजी, डॉ. प्रसाद मुगळीकर यासह रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ट्रेनमधून खाली पडणे किंवा अन्य वैद्यकीय आपत्तीत तत्काळ उपचार या कक्षातील डॉक्टरांच्या मदतीने देण्यात येईल. या कक्षामध्ये ईसीजी, डिफिब्रिलेटर, पुनरुत्थान सुविधा, नेब्युलायझर आदी सुविधा आहेत. तसेच स्वतंत्र औषध विक्री विभाग असून, आपत्कालीन परिस्थितीत लागणारी सर्व औषधे येथे उपलब्ध होतील. रूबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, या ठिकाणी एक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी अशी टीम २४ तास उपलब्ध, रेल्वे प्रवाशांना प्राथमिक उपचार मोफत ; तर अन्य नागरिकांसाठी शंभर रूपये फी, आपत्कालीन स्थितीत घटनेपासून रुग्णालयात तात्काळ रुग्णवाहिका सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेत जावूनही तपासणी करणार, ईसीजी, डिफिब्रिलेटर, नेब्युलायझर आदी सुविधा उपलब्ध, स्वतंत्र औषधालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.