पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सप्टेंबरमध्ये राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत पुणे विभागातील सर्व स्थानकांतील तब्बल २० हजार ५६९ फुकट्या प्रवाशांकडून ९३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर सप्टेंबरमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २० हजार ५६९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून ९३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आरक्षित स्लीपर बोगीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल ११ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर, प्रवासादरम्यान क्षमतेहून अधिक साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, हेमंत कुमार बेहरा यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी तिकिटासह प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, अशी माहिती पुणे विभागीय जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.