पुणे : पुणे विभागातील तिकीट तपासणी दरम्यान जुलै २०२४ मध्ये १३ हजार १६७ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. अशा फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने एका महिन्यात तब्बल ५३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासोबतच १२३४ प्रवाशांना अनियमितपणे आणि योग्य तिकीटाशिवाय प्रवास केल्याबद्दल ४ लाख ९८ हजार रुपये दंड तर बुक न केलेले सामान घेऊन जाणाऱ्या २१९ प्रवाशांकडून २८ हजार ६१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट तपासणी निरीक्षक आणि रेल्वे संरक्षण दल यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे.