लोणी काळभोर, ता. 3 : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. याच उड्डाणपुलावर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.2 जानेवारी) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
त्यामुळे अजून ‘किती निष्पापांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? विद्यमान खासदारसाहेब, आमदारसाहेब आतातरी लक्ष द्या!’ या मथळ्याखाली पुणे प्राईम न्यूजने शनिवारी (ता. 4) बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. आणि प्रशासनाने अवघ्या पाच दिवसाच्याआतच उड्डाणपुलावरील कठडे आज गुरुवार (ता.9) पासून काढण्यास सुरवात केली आहे.
पुणे-सोलापुर महामार्गावरून नगर रस्त्याला अथवा पुण्याच्या गर्दीतून बाहेर जायचे असेल तर अनेक वाहनचालक थेऊर फाट्याच्या मार्गाचा वापर करतात. कारण वेळ आणि अंतरही कमी होते. मात्र थेऊर फाट्याकडून थेऊरच्या दिशेकडे अथवा नगर रस्त्यावरून पुणे सोलापूर महामार्गाकडे जात असताना, चालकांना रेल्वेच्या उड्डाणपुलावरून जावे लागते. या उड्डाणपूलावर दोन्ही बाजूकडे असलेले कठडे हे चालकांसाठी धोकादायक बनले होते.
वाहनचालकांना गाडी चालविताना हे कठडे अचानक रस्त्यातच येत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. विशेषतः दुचाकी चालकांना समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांची लाईट चमकल्याने कठडे दिसत नव्हते, त्यामुळे बहुतांशी अपघात हे दुचाकी चालकांचे होत होते. त्यामुळे थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूलावरील कठडा मृत्यूचा सापळा बनत चालला होता.
दरम्यान, थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे हटविण्याची मागणी नागरिक अनेक वर्षापासून करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने अनेकदा स्वयंसेवी संस्था व कुंजीरवाडी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकीतून अपघातग्रस्त कठड्याला रेडीअम व छोटे छोटे रेडिअमचे पोल कठड्यावर लावले होते. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना ते दिसत होते. मात्र काही महिन्यानतंरच ते गायब झाल्याने उड्डाणपूलावरुन दुचाकीस्वारांचा प्रवास धोक्याचा झाला होता. त्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात होते.
त्यातच मागील आठवड्यात 2 जानेवारीला थेऊर फाटा येथील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात रामेश्वर किशोर राठोड (वय-23) व श्याम गजमल जाधव (वय 29, दोघेही सध्या रा. टिळक नगर कात्रज, पुणे, मूळ रा. जामठी गाव, ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांचा जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. “खासदार ” ”आमदार” साहेब आत्ता तरी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनीधी या नात्याने लक्ष द्या. एवढीच नागरीकांची आपल्याकडे हात जोडुन विनंती केली होती.
याबाबत थेऊर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पै. युवराज काकडे यांनी थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील अपघाताची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व पीडब्लूडीचे (विशेष रस्ते) आर वाय पाटील यांना फोनद्वारे दिली होती. तसेच रेल्वे उड्डाणपुलावरील तत्काळ कठडे कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी केली होती. काकडे यांनी केलेल्या मागणीची व पुणे प्राईम न्यूजने केलेल्या बातमीची प्रशासनाने त्वरित दखल घेतली. व अधिकाऱ्यांच्या एका टीमने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा सेफ्टी ऑडीट अहवाल पाठविला. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसाच्या आत आज गुरुवार (ता. ९) पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलावरील कठडे काढण्यास सुरवात केली आहे.
सरपंच झाल्यापासून थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्यापासून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रेल्वे उड्डाणपुलावर रेडीअम व छोटे छोटे रेडिअमचे पोल बसविले होते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात अपघात कमी झाले होते. मात्र या रस्त्यावरून एखाचा नवीन चालक गाडीवरून जात असेल तर त्याच्या समोर अचानक रस्त्यातच कठडे येत असल्याने अपघात होत होते. उड्डाणपुलावरील कठडे हटविण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे. प्रशासनाकडून आजपासून कठडे काढण्यात सुरवात केली आहे. त्यामुळे नागरिकांचा आता जीव जाणार नाही. याचा एकीकडे आनंद होत आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या बाबत दुख: वाटत आहे.
हरेश गोटे (सरपंच-कुंजीरवाडी, ता. हवेली)
थेऊर रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून झालेल्या अपघाताची संख्या मोठी आहे. अपघात होण्यास हा कठडाच कारणभूत ठरत होता. कठड्याला धडक दिल्याने वाहनचालकाच्या डोक्याला मोठी दुखापत होत होती. त्यामुळे अनेक नागरिकांचा जागीच अथवा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रेल्वे उड्डाणपुलाचा कठडा जीवघेणा ठरत असल्याने वारंवार सर्वांनी पाठपुरावा करून हा कठडा काढण्याची मागणी केली होती. तसेच पुणे प्राईम न्यूजने बातम्या करून प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वळविले होते. त्यामुळे या मागणीला यश आले आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
सचिन तुपे (माजी सरपंच – कुंजीरवाडी, ता. हवेली)
सार्वजनिक बांधकाम विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व पीडब्लूडीचे (विशेष रस्ते) आर वाय पाटील यांनी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ उड्डाणपुलावरील कठडे काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे काढण्यास आजपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे कठड्याला धडकून अपघात होण्याचे प्रमाण आपोआपच कमी होतील. व निष्पाप नागरिकांचे जीव वाचतील. त्यामुळे सर्वात प्रथम चव्हाण साहेब व पाटील साहेब यांचे आभार मानतो.
पै. युवराज काकडे (सदस्य- थेऊर)