पुणे: काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) च्या शनिवारी झालेल्या बैठकीस शिवसेना (उबाठा) पक्षाचे दोन्ही शहरप्रमुख गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीत धुसफुस सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली होती. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्ष या घटक पक्षांच्या नेत्यांमधून वाद यापूर्वी अनेकवेळा उघड झाले आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटप पूर्ण होत आले आहे.
मात्र, मुंबई आणि विदर्भातील जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यात वाद झाला. त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्याचे पडसाद हे पुण्यात उमटल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. त्यासाठी काँग्रेसकडून गजानन थरकुडे आणि संजय मोरे हे शिवसेनेचे दोन्ही शहरप्रमुख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना निरोप देण्यात आला होता.
प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला संजय मोरे आणि थरकुडे हे अनुपस्थित होते. दरम्यान गजानन थरकुडे यांनी सांगितले की, निरोप उशिरा मिळाल्याने उपस्थित राहता आले नाही.