पुणे: पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात एका अल्पवयीन बिल्डर पुत्राने शनिवारी (दि. १८) मध्यरात्री पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा तो मुलगा आहे. त्याने मोटारसायकलवरून घरी निघालेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना गाडीखाली चिरडले होते. यावेळी पोर्शे कार इतक्या वेगात होती की, अश्विनी कोस्टा हवेत उंच जाऊन जमिनीवर आपटली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचा मित्र अनिस याच्या बरगड्यांना जबर मार लागल्याने त्याचाही मृत्यू झाला.
या अपघातानंतर जमावाने अल्पवयीन मुलाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर पोलिसांनी या मुलाला विशेष वागणूक दिल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर कारचालक मुलगा आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीडच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरुन पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर केला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्य पदार्थ पोलीस सटेशनच्या मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात आणल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले होते.
ही बाब समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करुन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यानंतर आता याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे आता येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावणे, मुलाचे मेडिकल चेकअप प्रोसेस अतिशय संथ पद्धतीने केल्याबद्दल पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच अल्पवयीन मुलाला पोलीस सटेशनमध्ये व्हीआयपी सेवा दिल्याप्रकरणी देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास पोलिसांवर कठोर कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
पुणे पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणात जर आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली आहे का? हे त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून पाहावे. जर ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.