पुणे : येथील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता मोठी बातमी समोर येत आहे. या अपघातप्रकरणी पोलीसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. मुंबईतून पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आशपाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ससूनमधून रक्ताचे नमुने बदलण्यात या दोन आरोपींचा हात होता, अशी माहिती पोलीसांना तपासात समजली आहे. अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोप त्या दोन व्यक्तींवर आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे रक्त न घेता आईचे रक्त घेऊन मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
डॉ. अजय तावरेंच्या माध्यमातून श्रीहरी हरनोळ, अतुल कांबळे यांच्यासोबत अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली, रक्ताचे नमुने चुकीचे देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली. आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींवर आहे.
पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने त्या दोन आरोपींना मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. या आरोपींना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.