पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपी असणाऱ्या शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांना विशेष न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. 5) जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्याची संधी मिळणार आहे.
वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल यांना रविवारी दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आता या पाच दिवसांत पुणे पोलीस या प्रकरणाबाबत विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्याशी चौकशी करू शकतात. यातून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
शिवानी अग्रवाल यांनी मुलाच्या ऐवजी स्वत:चे रक्त तपासणीसाठी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तर या सर्वात विशाल अग्रवाल यांनी मदत केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार विशाल यांना शनिवारी सायंकाळी ससूनमधील डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्हात अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात विशाल यांना अटक करण्याची परवानगी मिळण्याबाबत अर्ज पोलीसांनी शुक्रवारी दाखल केला होता. या प्रकरणात त्यांच्यावर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे.