पुणे : पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात रोज नवीन काही ना काही माहिती समोर येत आहे. एकाच कुटुंबातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही पुण्यातील कदाचित पहिलीच वेळ असेल. या अपघात प्रकरणातील पोर्शे कारचालक अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिवानी अग्रवाल यांनीच ससून रक्ताचे सॅम्पल दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.
मुलाच्या रक्तात दारू सापडू नये म्हणून शिवानी अग्रवालने अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलसोबत स्वत:चे ब्लड सॅम्पल बदलले होते. शिवानी अग्रवाल ने केलेल्या चौकशीत रक्त दिल्याचे कबूल करतानाच मुलगाच गाडी चालवत होता, अशी माहिती दिली आहे. रक्त नमुने बदलल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांना ते रक्त कोणाचे हे शोधायचे होते. मात्र शिवानीने ते रक्त आपले असल्याची कबुली दिली आहे. आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.
यावेळी पोलिसांनी ससूनमधील सीसीटीव्ही पाहिल्यानंतर अल्पवयीन मुलासह चौघेजण उपस्थित असल्याचे समोर आले. याप्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच निलंबनाची सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत पुराव्यांशी छेडछाड, ड्रायव्हरला धमकावणे तसेच रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकून देण्याच्या आरोपाखाली दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सध्या अग्रवालच्या कुटुंबातील तीनजण अटकेत आहेत. आणि अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहात आहे. दरम्यान, शिवानी अग्रवालच्या चौकशीत नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.