पुणे : पुण्यामध्ये कल्याणीनगरभागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने राज्यासह देश ढवळून निघाला होता. या प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एल. एन. धनवडे आणि कविता थोरात अशी या दोन सदस्यांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे.
19 मेच्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमधे हा भीषण अपघात झाला होता. या अपघातातील दारुच्या नशेत पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलीसांनी अटक करुन बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते. मात्र एल. एन. धनवडे आणि कविता थोरात यांनी तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्या अल्पवयीन आरोपीची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाकडून या दोघांची चौकशी करण्यात आली आणि त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. चौकशीत दोषी आढळल्यानंतर आता या दोघांना बाल हक्क न्याय मंडळावरून बडतर्फ करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारुच्या नशेत भरधाव वेगानं आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिश अवधिया (27 वर्षे) आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा या 15 फूट दूर फेकली गेली होती.
या अपघातानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालन्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बालन्याय मंडळाने त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही शिक्षा दिल्या आणि त्याचा जामीन मंजूर केला होता.
हा जामीन ज्यांनी दिला त्या बालन्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभांगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने सरकारकडे केली होती. त्यानंतर महिला आणि बाल विकास आयुक्तांनी या सदस्यांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. तसेच त्या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.