पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी बावधन येथील एका बांधकाम साईटमध्ये सदनिका घेतलेल्या 72 नागरिकांना ठरवून दिलेल्या सोयी सुविधा न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नॅन्सी ब्रह्मा असोसिएटस या प्रकल्पाचे विकसक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, राम कुमार अग्रवाल, विनोद कुमार अग्रवाल, नंदलाल किमतानी, आशिष किमतानी आणि इतर लोकांच्या विरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विशाल अरुण अडसूळ (वय -42, रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बावधन पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.