पुणे : पीएमपी बस ड्रायव्हरला पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर मारहाण करणारा पोलीस कर्मचारी टीकेचा धनी ठरला होता. त्याच्या या वर्तवणुकीवरून संपूर्ण पोलीस दलावरच टीका केली जात होती.तसेच नुकसान भरपाई म्हणून ३ हजार रुपयेही दिले होते.
त्यानंतर हे प्रकरण मिटले असे वाटले असतानाच किरकोळ कारणावरून कायदा हातात घेणाऱ्या पोलीस शिपायाची गंभीर दखल घेत अखेर या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातले आदेश काढले आहेत. राहुल अशोक वाघमारे असं मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाचं नाव आहे. तो मोटर परिवहन विभागात नेमणुकीस आहे. भागवत बापूराव तोरणे या पीएमपी ड्रायव्हरला त्याने मारहाण केली होती.
मारहाणीची घटना घडली त्यादिवशी राहुल वाघमारे रात्रपाळी संपवून दुचाकीने आपल्या घरी निघाले होते. वाडिया कॉलेज जवळ पीएमपी चालक भागवत तोरणे यांनी कट मारल्याचा राग मनात धरून त्यांनी पीएमपीला दुचाकी आडवी लावून बस मध्ये चढून वाघमारे यांनी ड्रायव्हर तोरणे यांना हाताने मारहाण केली. याच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राहुल वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.