पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पूजा खेडकर यांनी पुणे पोलिसांची नोटीस देऊनही ती अद्याप वाशीममध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकरला उद्या शनिवारी (दि.20 जुलै) पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. पुजा खेडकर यांना या आधीही नोटीस देऊन काल गुरुवारी (दि.18 जुलै) रोजी पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. मात्र, त्या उपस्थित न राहिल्यानंतर दुसरी नोटीस देण्यात आली आहे.
पूजा खेडकर सध्या वाशिम येथील विश्रामगृहावर मुक्कामी आहेत. जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुणे पोलीसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याबाबत केलेल्या तक्रारीचा जबाब पूजाने पुणे पोलीसांकडे नोंदविणे अपेक्षित होतं. मात्र पूजा खेडकरने वाशिमला मुक्कामी राहणं पसंत केलं आहे.