पुणे: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस चांगलेच ऍक्शनमोडमध्ये आले आहेत. शहरातील अट्टल गुन्हेगारांची पुन्हा एकदा वरात काढण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस चौकीच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावत ही वरात काढण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये , यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील अट्टल गुन्हेगारांची वरात काढण्यात येत आहे.
संपूर्ण देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच सात मे रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 13 मी रोजी पुणे, शिरुर आणि मावळ या तीन मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंग, गोळीबार आणि गाडी तोडफोडीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांची परेड काढत त्यांना तंबी देण्यात येत आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना तंबी देण्यात येत आहे. गुरुवार 2 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकीत गुन्हेगारांना बोलवण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास 1000 गुन्हेगारांना समज दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावत त्यांना पोलिसांकडून चांगलाच दम दिला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा नाही, केला तर याद राखा, अशा शब्दांत गुन्हेगारांना दम दिला जात आहे. इतरवेळी हे सर्व गावगुंड म्हणून वावरणारे आणि आपल्या परिसरात दहशत माजवणारे पोलीस ठाण्यात एकदम चिडिचूप उभे राहत आहेत.