पुणे : पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. कल्याणी नगर भागात 19 मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यपान करून भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यानंतर अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आरोपी मुलाची बाल सुधारगृहातून सुटका केली आहे.
मात्र, या प्रकरणी आता पुणे पोलिस अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करणार आहेत. यासाठी पोलिसांना राज्य सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
आरोपीची पुन्हा बाल सुधारगृहात रवानगी ?
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाकडून घडलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत आहेत. सुप्रीम कोर्टाने पुणे पोलिसांची मागणी मान्य केली, तर आरोपी अल्पवयीन मुलाची पुन्हा बाल सुधारगृहात रवानगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जामिनानंतर पुन्हा ताब्यात घेणं हे बेकायदेशीर : हायकोर्ट
दरम्यान, या अपघात प्रकरणावर २५ जून रोजी हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी हायकोर्टाने अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहातून सुटका करण्याचे आदेश दिले होते. पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला जामिन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं हे बेकायदेशीर आहे, असं हायकोर्टाने म्हटले होते.