पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अपघाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामधील बहुतांश घटना हिट अँड रन प्रकरणातील असल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. त्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दारु पिऊन वाहन चालवल्यास ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.
पुण्यात गेल्या 6 महिन्यात 1648 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता कायम असतानाच काही दिवसांपूर्वी चेक पॉईंटवर चेकींग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच आता चेक पॉईंटवर गाडी अडवल्याचा राग आल्याने नोकरी कशी करतोस, तेच बघतोच, असं म्हणत थेट पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर 6 महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. आता पोलिसांनी याप्रकाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.