पुणे : शहरातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार निरज उर्फ गुण्या सुरज हिनोटिया (वय-20 रा. एन.डी.ए. पोलीस चौकी मागे, उत्तमनगर, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही 84 वी कारवाई आहे.
आरोपी निरज उर्फ गुण्या हिनोटिया उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार आहे. त्याने आपल्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकू, कोयता यासारख्या धारदार हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगून दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या दोन वर्षात त्याच्यावर 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवितास व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे येथील नागरिक त्याच्याविरुद्ध उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
आरोपी निरज उर्फ गुण्या हिनोटिया याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी निरज उर्फ गुण्या हिनोटिया याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारावाई उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, गुन्हे शाखा पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.