पुणे : राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. वैभवशाली परंपरा असणाऱ्या पुण्यात देशातील वेगवेगळ्या भागातून लोक गणेशोत्सवासाठी येतात. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या गर्दीमध्ये तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडतात. मात्र, आता छेड काढणाऱ्यां तरुणांवर त्वरित कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
याबाबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांचे दागिन्यांची चोरी, तसेच मोबाईल चोरी याबाबायतचे गुन्हे रोखण्यासाठी मध्यभागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. छेड काढल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास बंदोबस्तावरील पोलीस सडक सख्याहरींना पकडून त्यांचे छायाचित्र भर चौकात लावण्यात येणार आहेत. छेडछाड करणाऱ्या तरुणांची पोलिसांकडून धिंडही काढण्यात येणार असल्याचा, इशारा आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
महिला पोलिस यांची पथके, तसेच दामिनी पथक गर्दीत गस्त घालणार आहेत. साध्या वेशातील पोलिसांची पथके मध्यभागात गस्त घालणार आहे. गर्दीत महिलांची छेड काढणारा, तसेच अश्लील कृत्य केल्याचे आढळून आल्यास त्याची छायाचित्र काढण्यात येणार आहे.
छेड करणाऱ्यांवर होणार कारवाई
गणेशोत्सवात छेड काढणाऱ्याचे नाव, पत्ता, छायाचित्र फलकावर छापण्यात येणार आहेत. अशा प्रकारचे पोलिसांकडून फलक भर चौकात लावण्यात येणार आहेत. तसेच रोड रोमिओची पोलिसांकडून धिंड काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.