पुणे: पुणे शहरातील हडपसर पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीत नुकताच एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली असता पोलीस दलातील तीन जण दोषी असल्याचे आढळून आले. यामुळे मगरपट्टा पोलीस चौकीत कार्यरत असणारे एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आले. त्यानंतर आता या प्रकरणी हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
तसेच मंगळवारी लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या वाघोली पोलिस चौकीसमोरच एका तरूणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यामुळे लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची देखील उचलबांगडी करण्यात आली आहे. या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या उचलबांगडीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुजोरा दिला आहे.