पुणे: पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने बदली (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आयपीएस रितेश कुमार यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर 2020 रोजी अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
त्यापूर्वीही 20 ऑक्टोबर 2005 ते 6 जुलै 2007 असे दोन वर्षे नागपूरला पोलिस उपायुक्त म्हणून ते कार्यरत होते. नागपुरात कार्यरत असताना त्यांनी डी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगचा भंडाफोड केला होता. बिहारमधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करीही त्यांनी उघड केली होती. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सेवा दिली.
अमितेश कुमार यांची कारकीर्द तशी चर्चेत आहे. अमितेश कुमार यांनी 2005 ते 2007 या कालावधीत नागपूर येथे कार्यरत असताना त्यांनी क्रिकेट विश्वात भूकंप घडवला होता. तेव्हा नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होता आणि वेस्ट इंडिजची चमू हॉटेल प्राईडमध्ये मुक्कामी थांबला होता. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तकामध्ये होणारी बातचीत टॅप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.
तर सध्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोक्का कारवाई करुन गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. रितेश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल 115 संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का कारवाई करुन अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हेगारांची समाजात निर्माण होत असलेली दहशत कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाणेनिहाय माहिती घेऊन गुन्हेगारांवर कारवाई केल्याने पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख खाली आला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील 17 जणांवर मोक्का कारवाई केली आहे.