पुणे : सार्वजनिक ठिकाणी, पदपथ आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलीच जरब बसणार आहे. बेशिस्त नागरिकांना कचरा टाकण्याची शिक्षा म्हणून तब्बल ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून, त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता दंडाची रक्कम वाढविल्याने कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे. सार्वजनिक ठिकाणी, पदपथ आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना जरब बसावी, यासाठी दंडाची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली आहे.
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना यापूर्वीच्या नियमानुसार १८० रुपयांचा दंड आकारला जात होता. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आदींसाठी हा दंड केला जात होता. दंडाची रक्कम पूर्वी शासन मान्यतेने निश्चित करण्यात आली आहे. त्यात कालानुरूप वाढ झालेली नव्हती. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, यापुढे १८० रुपयांऐवजी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, दंडाची रक्कम कमी असल्याने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, त्यांना जरब बसत नाही. कचरा टाकताना सापडल्यास १८० रुपये भरून नागरिक मोकळे होत होते. त्यामुळे दंड रक्कम वाढत असली, तरी शहर अस्वच्छ राहण्याचे प्रमाण कायम राहत होते. आता दंड रकमेत वाढ केल्याने त्याला आळा बसेल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी केला आहे.