पुणे : पुणे शहर आणि परिसरात आठवडाभरापासून उन्हाच्या झळा जाणवत आहेत. कमाल तापमान ३८.९ अंशांवर पोहोचल्यामुळे उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांत आणखी २ ते ३ अंशांनी तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (आयएमडी) हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मार्चच्या तुलनेत शहराच्या तापमानात लक्षणीय बदल झालेला नाही. मात्र, तापमानात बदल जाणवत आहे. अरबी समुद्रातील ओलाव्यामुळे उष्णता वाढत आहे. महाराष्ट्राचे तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
दरम्यान, हिट वेव येण्याची शक्यता पाहता पुणे महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. पुणे महानगर पालिकेने उष्माघातापासून वाचण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. तसेच बाहेर जाताना काय काळजी घ्यावी याची देखील माहिती दिली आहे. पुणेकरांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. अकोल्यात ४१.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्याशिवाय अमरावती, वर्धा, यवतमाळ, परभणी, जेऊर, मालेगाव, सोलापूर येथे ४०.० किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने तापमानात वाढ होण्याचा अंदाज यापूर्वीच दिला होता. तसेच पुढील ३ ते ४ दिवस ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
मालेगाव आणि जळगाव येथे ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या मार्चमध्ये कमी दमट वातावरण होते, त्यामुळे यंदाच्या असामान्य उष्णतेच्या लाटेपेक्षा तुलनेने थंड तापमान होते. दरम्यान, कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे.
पुणेकरांनो, घराबाहेर पडताना ही काळजी घ्या…
– उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत.
– सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत.
– तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे.
– बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे आणि पाणी भरपूर प्यावे.
– डिहायड्रेशन होऊ देऊ नये.
– लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी प्यावे.