पुणे : पावसाळा सुरू होताच दरवर्षी कात्रज घाट आणि बोगदा परिसर चर्चेत येतो, तो तेथील आपघातांमुळे. आजही पुणे-बेंगळुरू महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्यावर दरड कोसळली आहे. हे वृत्त समजताच पुणे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
राज्य परिवहन बसच्या चालकाला पुण्याहून साताऱ्याकडे जाताना रस्त्यावर काही दगड दिसले, त्यानंतर त्यांनी बसमध्येच प्रवासी म्हणून असलेले अग्निशमन दलाचे जवान सागर इंगळे यांना ही माहिती दिली. इंगळे यांनी ताबडतोब अग्निशामक दलाला पाचारण केले.
पुणे-सातारा मार्गावरील शहरातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळल्याने सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच वाहतूक मार्ग मोकळा करत आहोत .
“पीएमसी आपत्ती व्यवस्थापन कक्षासह आमची टीम सध्या ढिगारा साफ करण्यासाठी घटनास्थळी आहे. काही वेळात वाहतूक सुरळीत होईल”, असे पीएमसी अग्निशमन दलाचे अधिकारी नीलेश महाजन म्हणाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्याच्या सातारा टोकावरील प्रवेश करण्याच्या भागात दरड कोसळली. राज्य परिवहन बसच्या चालकाला पुण्याहून साताऱ्याकडे जाताना रस्त्यावर काही मोठे दगड दिसले. त्यांनी बसमध्ये उपस्थित अग्निशमन दलाचे जवान सागर इंगळे यांना माहिती दिली. ते पुण्यात कामासाठी निघाले होते.
ते सांगतात, “आमची बस जुन्या कात्रज बोगद्याजवळ असताना अचानक काही दगड आणि झाडं रस्त्यावर पडली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत ढिगारा आणि खड्डे हटवण्यास सुरुवात केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.”