Pune : पुणे जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याची स्पष्ट माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये तसेच इंधनाचा अनावश्यक साठा टाळावा, असे आवाहन पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी केले आहे.

सध्या इंधनाचा पुरवठा सुरळीत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे असोसिएशनने सांगितले. सोशल मीडियावर पसरत असलेल्या तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि ते पुढे पाठवू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तेल कंपन्यांनीही पुण्यात इंधन पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री दिली आहे.

असोसिएशनकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून जिल्हा प्रशासन, राज्य शासन, तेल कंपन्या तसेच पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाशी नियमित समन्वय ठेवला जात आहे. पुढील कोणतीही महत्त्वाची माहिती अधिकृत प्रेस नोटद्वारेच जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले. तोपर्यंत पुणेकरांनी शांतता राखून अफवांपासून दूर राहावे आणि जबाबदारीने इंधनाचा वापर करावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी केले आहे.







