Pune News : पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे नागराज मंजुळे. मातीतल्या अनेक कलाकारांना त्यांनी मोठं केलं. सामान्य लोकांनाही आपलेसे वाटतील असे चित्रपट रुपेरी पडद्यावर घेऊन येणं ही मंजुळे यांची खासियत आहे. फँड्री, सैराट, नाळ, झुंड यांसारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले. कित्येक मुलामुलींना त्यांनी अभिनय क्षेत्रात संधी दिली, ज्यांनी पुढे बॉलिवूड देखील गाजवलं. याच नागराज अण्णांमुळे प्रेक्षकांना आर्ची, परशा, जब्या अन् शालू भेटली. सध्या नागराज मंजुळे यांनी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. आता या चित्रपटात नवोदीत कलाकारांना काम करण्याची नामी संधी नागराज अण्णा यांनी स्वतः देऊ केली आहे.
नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आण्णांनी आजपर्यंत ज्या नवोदीत कलाकारांना आपल्या चित्रपटात संधी दिली, त्या सगळ्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अभिनय क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना त्यांनी या कलाकारांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवलं.(Pune News) त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक नवखी मुलं नंतर अभिनय क्षेत्रात आली. आता पुन्हा एकदा अशा काही नवोदित कलाकारांना मंजुळेंच्या चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मंजुळे यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी नवोदित कलाकारांना ऑडिशन देण्याचं आवाहन केलं आहे.
नागराज मंजुळे यांनी सध्या त्यांच्या जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित ‘खाशाबा’ या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. ‘झुंड’ आणि ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमानंतर नागराज यांच्या या आगामी मराठी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. त्यासाठी त्यांना काही मातीतल्या मुलांची गरज आहे. (Pune News) तुम्ही या संधीची वाट पाहत असाल, तर पुढे दिलेल्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. ‘खाशाबा’ या चित्रपटात नवोदीत कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
‘खाशाबा’ चित्रपटासाठी ऑडिशन कशी द्याल?
– या चित्रपटात फक्त ७ ते २५ वर्षे वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतात.
– मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक.
– ऑडिशनसाठी येताना पाच फोटो ( त्यातील ३ फोटो शरीरयष्टी दाखवणारे) घेऊन येणे आवश्यक.
– ३० सेकंदाचा कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ आवश्यक.
– ३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ आवश्यक.
– फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै ही आहे.
अशी पोस्ट नागराज मंजुळे यांनी केली आहे. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे करत आहेत. (Pune News) त्याबरोबर नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. तुम्ही ऑडिशनच्या या अटी पूर्ण करू शकत असाल, तर एकदा ऑडिशनसाठी जाऊन आपलं नशीब आजमवायला काय हरकत आहे?
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिंहगड घाट रस्त्यावर ४ ते ५ ठिकाणी दरडी कोसळल्या ; नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर