Pune News : पुणे : ईडीमुळे मी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आलेली नाही, हे मी सर्वांसमोर जाहीर करतो. साहेबांची साथ सोडण्याच्या माझ्या निर्णयामागे वैयक्तिक हित देखील नाही. पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून मी असं केलं, असा आरोप देखील काहींनी केला. मात्र माझा आणि या डेअरीचा काडीमात्र संबंध नाही. या डेअरीमध्ये माझी एक रुपयाचीही गुंतवणूक नाही, असं स्पष्टीकरण देत दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ का सोडली याचा खुलासा कार्यकर्त्यांसमोर केला.
शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वळसे पाटील हे बंडखोरांच्या गटात गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, ईडीच्या कारवाईच्या धोक्यामुळे वळसे पाटलांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भूमिका स्पष्ट केली. (Pune News) तसेच आपल्यावर होत असलेल्या आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रथमच वळसे पाटील मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत राहणं गरजेचं असतं
वळसे पाटील म्हणाले की, “एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवार साहेबांचे प्रेम असा पेचप्रसंग माझ्या मनात निर्माण झाला होता. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत राहणं गरजेचं असतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. शरद पवार साहेबांसारखा मोठा नेता असतानाही आम्हाला एकहाती जनतेनं सत्तेत का बसवलं नाही? हा प्रश्न देखील सतावत होता. पण माझी लढाई साहेबांशी नाही. (Pune News) मी सांगेन, आंबेगावमध्ये साहेबांची सभा होईल, तेव्हा तुम्ही सगळे त्या सभेला आवर्जून जा. निवडणुकीत काय होईल, याची मी चिंता मला नाही.
वळसे पाटील म्हणाले की, काहींनी निष्ठेचा प्रश्न निर्माण केला आहे. मला त्याची शिक्षा जरूर द्या. ज्यांना कारखान्याचे अध्यक्ष केले, लोकसभेचे तिकीट दिले. आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी नशीब अजमवायला हरकत नाही, असा टोला वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांना लगावला आहे. (Pune News) अजित दादांच्या सोबतीने मी मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो आहे. पण मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच मी काम करणार आहे. शरद पवार आपले नेते असून आपली लढाई शरद पवार साहेबांशी नाही.
रोहित पवारांमुळे हा निर्णय घेतला का, अशीही चर्चा होत आहे. मी एवढेच सांगेन, मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही. रोहित पवार यांचे वय ३७ वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन ४० वर्षे झाली. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं. (Pune News) माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा. या व्यतिरिक्त माझं कोणतंही भांडण नाही.
मी घेतलेला निर्णय योग्य आहे. मी कोणाशीही प्रतारणा केलेली नाही, असेही वळसे पाचील यांनी स्पष्ट केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खुशखबर! पुणेकर होणार वाहतूक कोंडीतून मुक्त… २७ हजार कोटींच्या प्रकल्पास मान्यता!
Pune News : पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय..उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला