Pune News : जालना : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने जीआर काढल्यानंतरही सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीवर ठाम असल्याचे सांगत, उपोषण सुरूच ठेवले आहे.
आंदोलनकर्त्यांना हात जोडून कळकळीचे आवाहन
राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू असतानाच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायम अग्रेसर असणाऱ्या नायगाव (ता. पाटोदा) येथील गोविंद गोपीचंद औटे (वय ४२) या तरुणाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (ता. ८) जालन्यात पत्रकार परिषद घेत समस्त आंदोलनकर्त्यांना हात जोडून कळकळीचे आवाहन केले आहे.
या वेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या आंदोलनाला अखिल मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. वाढता पाठिंबा बघून आपल्याला यश येण्याची शक्यता जास्त आहे. मराठा समाजाने आंदोलने करावीत, पाठिंबा वाढवावा; परंतु गालबोट लागेल असे आंदोलन कुणीही करू नका… आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नका. मी हात जोडून सर्वांना आवाहन करत आहे… आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी जीवाची बाजू लावत आहोत. तुम्हीच नसाल तर हे आरक्षण नेमकं कुणाला द्यायचं, असा सवाल जरांगेनी विचारला आहे.
आरक्षणाचा लाभ प्रत्येक मराठा घरातील तरुणाने, विद्यार्थ्याने उचलला पाहिजे. म्हणून आमचा हा अट्टाहास आहे. पण तुमच्यातीलच काही लोक जीवन संपवण्यासारखे वेगळे निर्णय घ्यायला लागले, तर त्या आरक्षणाचा फायदा कोण घेणार, असही जरांगेनी नमूद केलं.