Pune News : पुणे : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. याचबरोबर राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रवेशाने पुणे शहर व जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. आगामी निवडणुका विचारात घेतल्यास पुणे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवायचे असेल, तर पालकमंत्रीपद महत्त्वाचे ठरणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आता पुण्याच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकणार आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आमदार भरणे यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिल्याने इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्यामुळे पुण्यात भाजपची कोंडी होण्याची शक्यता
पुणे शहर व जिल्ह्यात मिळून २१ आमदार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या दोन महापालिका आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २००४ ते २०१४ या आघाडी सरकारच्या कालवधीत पवार यांच्याकडे हे पद होते. तर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतरदेखील अजित दादा यांच्याकडेच हे पद आले होते. (Pune News) कोविड काळात दादांनी पदाच्या माध्यमातून आपल्या कामाचा धडाका दाखवला होता. एवढेच नव्हे तर विरोधकांना देखील जवळ करण्याची संधी या पदाच्या माध्यमातून दादानी साधली होती.
अजित पवार यांच्या बंडानंतर पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. अजित पवार यांच्यामुळे पुण्यात भाजपची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Pune News) पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार यांनी दावा ठोकल्यास चंद्रकांतदादा की अजितदादा कोणत्या ‘दादा’कडे पालकमंत्रीपद जाणार, यावरून आता चर्चा रंगू लागली आहे. या परिस्थितीत भाजप काय निर्णय घेणार, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडल्याचं चित्र आहे. आज दोन्ही गटाची पुण्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे कोण कुठे जाणार, याचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त ; सीमा शुल्क विभागाची कामगिरी..
Pune News : फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेने वसूल केला तब्बल ९४ कोटींचा दंड