Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अधिकाऱ्यांनी रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पुणे शहराच्या विकासासाठी ते सातत्याने बैठका घेत आहेत. पुरंदर विमानतळ सुरु करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. आता पुणे शहरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात दोन शासकीय आयटीआय सुरु करण्यात येणार असून, त्यातील एक आयटीआय हवेलीत सुरु करण्यात येणार आहे. तर दुसरे येरवडा येथे सुरु करण्यात येणार आहे.
अजित पवार यांचा मोठा निर्णय
पुणे शहरातील उद्योजक आणि विद्यार्थ्यांना आनंद होईल, असा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. कुशल कर्मचारी निर्माण करण्यासाठी दोन शासकीय आयटीआय सुरु करण्यात येणार आहेत. आयटीआयसाठी पाच एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्यात वर्गखोल्यांशिवाय वर्कशॉप तयार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारींऱ्यांना दोन्ही आयटीआयच्या बिल्डींग बांधकामासाठी निधी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, आयटीआयसाठी यंदाच्या वर्षाच्या आरखड्यात निधी मंजूर केला जाणार आहे. तसेच या दोन्ही आयटीआयमध्ये स्थानिक उद्योजकांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांना फाटा देवून रोबोटीक, सीएनसी मशीन यांसारख्या अभ्यासक्रमाची आखणी येथे केली जाणार आहे. यामुळे उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.