Pune News : पुणे : अजित पवार यांच्या बंडानंतर राज्य विधानसभेत ४५ आमदार असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. पण पहिला आठवड्याचे कामकाज संपले तरी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे पत्र विधानसभा अधक्षांकडे सादर करता आलेले नाही.
‘या’ चार नावांची चर्चा!
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी करत जवळपास ४० आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. यामुळे शरद पवार गटाकडे राष्ट्रवादीतील १२ ते १५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. दोघांनी आपल्याकडे किती आमदार आहेत, त्याचा स्पष्ट आकडा अजून दिलेला नाही. (Pune News ) परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडीमुळे राष्ट्रवादीकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे येणार आहे. कारण विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आता काँग्रेसच आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा आधीच सांगितला. यामुळे पावसाळी अधिवेशन सुरु होताच काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दोन आठवड्यातील पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा झाला आहे. काँग्रेसने अजूनही नाव निश्चित केलेले नाही. काँग्रेसकडे या पदासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु दिल्लीतील आदेशाची प्रतिक्षा आहे.
पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांना विरोधी पक्षनेतेपदाची निवड करणे अवघड जात असावे, अशीही चर्चा आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार की नव्या चेहऱ्यांपैकी कोणाला संधी द्यायची यावर पक्षात खल सुरू आहे. (Pune News ) मात्र, अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपदात फारसा रस दाखविलेला नाही.
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचे नाव निश्चित करण्याकरिता काँग्रेस नेतृत्व आठवडाभर विचारमंथनच करीत असतानाच शेजारील कर्नाटकमध्ये दोन महिन्यांनंतरही भाजपला विरोधी पक्षनेता निवडण्यात अपयश आले आहे. (Pune News ) या पदावरून दोन्ही पक्ष परस्परांवर टीका करीत असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे हे अपयश मानले जात आहे.
दरम्यान, काँग्रेस हायकमांडकडून सूचना आल्याशिवाय काँग्रेसचा विरोधी पक्षनेता निवडला जाणार नाही, असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसचा विधानसभा अध्यक्षपदावर दावा होता. परंतु नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने त्यासाठी नाव निश्चित केले नव्हते. (Pune News ) त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना भाजपचे सरकार आले. त्या काळात महाविकास आघाडीचा अध्यक्ष असता तर निर्णय वेगळा असता. हा प्रकार पाहता विरोधी पक्षनेतेपदाची निवड लवकरात लवकर करावी, असा आग्रह राज्यातील काँग्रेस नेत्यांना आहे. आता पुढील एकच आठवडा अधिवेशन असणार आहे. त्या काळात तरी विरोधी पक्षनेतेपदाची निवड होणार का? हा प्रश्न काँग्रेसच्या आमदारांनाच पडला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणेकरांसाठी गुड न्यूज; वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळणार; काय आहे नवी प्रणाली?