पुणे : जुन्नर तालुक्यात वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष वाढत चालला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात फक्त जनावरेच नाही तर मानवदेखील मृत्यूमुखी पडत आहेत. परिणामी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यादरम्यान आता हा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी वनविभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे.
जुन्नरमध्ये पकडलेले बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झु मध्ये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जुन्नर वनविभाग हा मानव- बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित आभासी भिंत कार्यीन्वित करणारा विभागाचा पहिला प्रादेशिक विभाग असेल. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर विभागातील अनेक हॉटस्पॉटवर इन्स्टॉल केली जाणार आहे. यासोबतच AI अर्थात आर्टिर्फिशीयल इंटेजियन्सद्वारे लक्ष ठेवले जाईल. तसेच 150 नवीन पिंजरे, रेस्क्यू वाहने आणि व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे स्पेशल प्रोटेक्षण फोर्स वाढवला जाणार आहे.
या प्रणालीचा वापर प्रामुख्याने रीअल-टाइम मॉनिटरिंगद्वारे प्राण्यांच्या हालचालींची पूर्वसूचना देण्यासाठी, हल्ले टाळण्यासाठी आणि विशिष्ट झोनमध्ये दक्षता वाढवण्यासाठी केला जात आहे. तसेच मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) सीतारामपेठ येथील अभयारण्यात महाराष्ट्रात प्रथमच त्याची स्थापना करण्यात आली. तेथे, स्थानिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे, असे अधिका-यांनी सांगितले.