Pune News : पुणे : ताई, मी लोकलमध्ये आहे. माझ्यासमोर बसलेला एक तरुण माझ्याकडे अधाशीपणे पाहतोय. तो बऱ्याच वेळापासून माझा पाठलाग करतोय, अशी शंका माझ्या मनात येत आहे. माझी भितीने गाळण उडाली आहे. आता मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे… लोणावळा ते पुणे लोकलने प्रवास करणाऱ्या एका तरुणीने पुणे शहर पोलिसांच्या दामिनी पथकाला मदतीसाठी भावनिक साद घातली. दामिनी पथकाने मुलीला धीर देत, लोणावळा लोकल पुण्यात दाखल होण्याआधीच रेल्वे स्थानक गाठले. तरुणीला ताब्यात घेऊन सुखरूप तिच्या घरी पोहोचवले.
महिला, तरुणी, विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, विविध समस्या, मंगळसूत्र हिसकावणे, शाळा, कॉलेज याठिकाणी तरुणांकडून होणारा त्रास कमी व्हावा, महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी महिला मार्शल पथक ‘दामिनी’ सुरू झाले आहे. (Pune News ) दामिनी पथकातील महिला पोलिसांना फोन केल्यास काही वेळातच आपल्याला मदत मिळते.
पुणे शहर आणि जिल्हा परिसरात काही दिवसांपूर्वी गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या. सदाशिव पेठेत भर दिवसा तरुणीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. दर्शना पवारची निर्घुण हत्या झाली. या प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. (Pune News ) त्या पार्श्वभूमीवर दामिनी पथक, बडी कॉप, पोलीस काका आदी योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला होता. पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांना त्या दृष्टीने प्रशिक्षणही देण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरभरात दामिनी पथकांकडून गस्त घातली जात आहे.
दरम्यान, पुण्यातील एक तरुणी कामानिमित्त मुंबईला गेली होती. तेथून परतीचा प्रवास ती लोणावळा ते पुणे लोकलने करत होती. या प्रवासादरम्यान एक तरुण सातत्याने तिच्याकडे पाहत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तरुणाच्या हेतूवर शंका येताच तरुणीने तातडीने दामिनी पथकाशी हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली. ती तरुणी लोकलमधून शिवाजीनगर रेल्वे स्थानकात उतरण्याआधीच दामिनी पथक तेथे पोहोचले. (Pune News ) पोलीस कर्मचारी पाहून तो तरुण तेथून पळून गेला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी तरुणीला घरापर्यंत सोडले. दामिनी पथकाच्या मदतीमुळे तरुणी सुखावली.
पोलीस दलाच्या रचनेनुसार पाच परिमंडळांत ३० पोलीस ठाणी आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्यांसाठी दोन दामिनी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.(Pune News ) त्या हेल्पलाइनचे क्रमांक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी दर्शनी भागात लावण्यात आले आहेत; तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते प्रसारित केले आहेत.
दरम्यान, पेरुगेट येथील घटनेनंतर शहरातील दामिनी पथकांची संख्या वाढविली आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना त्यासाठी प्रशिक्षणही दिले आहे. अधिकधिका महिला, तरुणींपर्यंत दामिनी पथकाचे हेल्पलाइन नंबर पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यातून गरजूंना मदत पोहोचविणे शक्य होईल, अशी माहिती गुन्हे शाखा, शहर पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
अशी असते “दामिनी पथका’ची पेट्रोलिंग
दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचारी मोटारसायकलवरून शहरात पेट्रोलिंग करतात. शहरातील एटीएम सेंटर, शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, खासगी क्लासेससमोर, शोरुम, महिलांची गर्दी असलेल्या बाजारपेठेत, चित्रपटगृहासमोर पथक कार्यरत असते. (Pune News ) काही ठराविक ठिकाणी व्हिजिट बुक ठेवलेले असून, तेथे भेट दिल्याच्या नोंदी केल्या जातात. त्यांच्याकडे वॉकीटॉकी देण्यात आली आहेत. हे पथक रोडरोमिओंना छेडछाड करणाऱ्यांवर कडक नजर ठेवते. वेळ पडल्यास शहरातील टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गरज भासल्यास शहर पोलिसांची मदत घेतली जाते.