Pune News : पुणे : पीएमपीएमएल प्रशासनाला कोणतीही पुर्वकल्पना न देता पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांकडील चालकांनी शुक्रवारी (ता. २५) सकाळच्या सत्रात संप पुकारला आहे. या संपामध्ये पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रिक बसवर कार्यरत असलेले ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या तब्बल २०० बसचालकांचा समावेश आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचारी हे रोज या पीएमपीएमएलने प्रवास करतात. अचानक बसची संख्या कमी झाल्यामुळे अनेकांना कामावर पोहचायला उशीर झाला. तसेच अचानक पीएमपीएमएल बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
२०० चालकांचा अचानक संप….
महागाईच्या काळात किमान ७५० ते ९०० रुपयांपर्यंत रोज मिळायला हवा. मात्र, ठेकेदार आम्हाला फक्त ५३० रुपयेच देतात. इतक्या कमी पगारात आम्ही घर कसे चालवणार? त्यामुळे पीएमपी प्रशासनाने यात मध्यस्थी करून योग्य तो निर्णय घ्यावा,’ अशी मागणी चालकांकडून करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
बस चालकांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे पुणेकरांची गैरसोय होणार यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
दरम्यान, पीएमपीएमएलकडे सध्या २ हजार १८१ बस आहेत. त्यातील काही ठेकेदारांच्या भाडेतत्वावरील तर काही स्व:मालकीच्या आहेत. सुमारे ४ हजार चालकांमार्फत शहरात बससेवा पुरविली जाते. २ हजार चालक पीएमपीचे स्वत:चे तर २ हजार ठेकेदारांचे आहेत. यातीलच ट्रॅव्हल टाईम कंपनीकडील २०० चालकांनी शुक्रवारी अचानक संप केला. त्यामुळे पीएमपीच्या वाहतूकीवर सकाळी काही प्रमाणात परिणाम झाला. परिणामी, बसेसची वारंवारिता कमी झाली.