जीवन सोनवणे
Pune News : नसरापूर : हे जग स्पर्धेचे आहे. या जगात आपण अनेकदा इतरांबरोबर स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांमध्ये आपणही प्रवाहपतीत होऊन, वाहवत जातो. आपल्यामध्ये अनुकरणाची वृत्ती बळावते. मला वाटते, इतरांसोबत स्पर्धा करून वेळ वाया घालवण्यापेक्षा, स्वतःमधील गुण, ताकद ओळखा आणि वेगळी वाट निवडा. स्पर्धा ही नेहमी निकोप असावी आणि ती स्वतःसोबत करावी, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणे गरजेचे
नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये या वर्षीपासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होत आहे. डॉ. सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपथितीत आज या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गोसावी बोलत होते. हा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. या वेळी बोलताना डॉ. गोसावी पुढे म्हणाले की, आईस्क्रीम वितळण्यापूर्वी त्याची चव चाखायची असते. मेणबत्ती देखील वितळण्यापूर्वीच आपल्याला उजेड देत असते. अशाच प्रकारे काही गोष्टी हातातून निसटण्यापूर्वीच त्यांचा विचार करावा लागतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
डॉ. गोसावी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके यांनी नायगाव, नसरापूर येथे नवसह्याद्री शिक्षण संस्थेची २०१० साली स्थापना केली. आज ही शिक्षण संस्था पूर्णत्वास उतरलेली आहे. संस्थेमध्ये अभियांत्रिकी पदविका व पदवी, औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी, मॅनेजमेंट स्कूल व जुनिअर कॉलेज असे अनेक अभ्यासक्रम सुरु आहेत. या वर्षीपासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होत आहे. विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणे गरजेचे आहे.
या वेळी पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, धोंडीराम पवार, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवनाथ गोवेकर यांनी तर आभार डॉ. तानाजी दबडे यांनी मानले.