Pune News : पुणे : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता अनेक दिवसांपासून प्रस्तावित आहे. या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन देखील रखडले होते. अखेर या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, अधीक्षक अभियंता राहूल वसईकर, अपर जिल्हाधिकारी हणुमंत अरगुंडे उपस्थित होते.
राज्याच्या सकल राज्य उत्पादनामध्ये (जीएसडीपी) शहर आणि जिल्ह्याचे १५ टक्के योगदान आहे. प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्यामुळे वेगवान मालवाहतुकीला गती मिळून यामध्ये अधिक भर पडेल. त्यामुळे या प्रकल्पासाठी गतीने भूसंपादन प्रक्रिया करून प्रकल्पाला सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. (Pune News) या प्रकल्पात मोबदल्याची रक्कमही समाधानकारक निश्चित करण्यात आलेली असल्याने संमती करारनामे आणि संमती निवाड्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे. संमती करारनाम्याद्वारे एकूण मोबदल्याच्या २५ टक्के अतिरिक्त वाढीव मोबदला प्राप्त होऊ शकतो. या बाबीसह पारदर्शक पद्धतीने, लोकांच्या सर्व शंकांचे शंभर टक्के निराकरण करत आणि योग्य दस्तऐवजीकरण करत काम केल्यास सर्व प्रक्रिया गतीने आणि जमीनधारकांच्या सहकार्याने पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत पुणे जिल्ह्यातील महसूल, भूसंपादन, भूमी अभिलेख, मूल्यांकन आदी सर्वच विभागांनी अतिशय वेगाने काम करून मेट्रो मार्ग, पालखी मार्ग, पुणे- मिरज नवीन ब्रॉडगेज लाईन, लोणंद- बारामती नवीन रेल्वेमार्ग, चांदणी चौक एकात्मिक प्रकल्प आदींसाठी भूसंपादन प्रक्रियेत वाखाणण्याजोगे काम केले आहे. (Pune News) त्यामुळे या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासाठीही आवश्यक नोटिसा देणे, गावनिहाय शिबिरे आयोजित करणे आदी प्रक्रिया राबवित जास्तीतजास्त संमतीनिवाडे होतील याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये येणारी ३० ते ४० टक्के वाहतूक बाहेरच्या बाहेरून मार्गस्थ होईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या, पुणेकरांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे आता पुणे (पश्चिम) वर्तुळाकार मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यायची असून पूर्व वर्तुळाकार मार्गासाठीच्या भूसंपादनाबाबतही वेळेत नियोजन करण्यात येईल, असे एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणारा तरूण ताब्यात
Pune News : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात
Pune News : पुण्यात पाचशे रुपयांसाठी हातात तलवार घेवून घरात शिरून शिवीगाळ ..